पुणे: खासगी वित्तीय संस्थेची शाखा सुरू करण्याच्या आमिषाने पुण्यातील एका व्यावसायिकाची एक कोटी ३४ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी याकुब अली ख्वाजा अहमद उर्फ याका (वय ४६, रा. हैद्राबाद, तेलंगणा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लष्कर भागातील एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. आरोपी याकुबअलीने झायसोल इंटीग्रेटेड सोल्यूशन्स प्रा. लि. या खासगी वित्तीय संस्थेचे पुण्यात कार्यालय सुरू करायची आहे.
वित्तीय संस्थेच्या कार्यालयासाठी जागा हवी आहे तसेच वित्तीय संस्थेचे कार्यालय सुरू करण्यास मदत करतो, असे आमिष त्या व्यावसायिकाला दाखविले होते. वित्तीय संस्थेकडून कर्ज पुरवठा केला जात असून या व्यवसायात मोठा नफा मिळतो, असे आमिष त्याने दाखविले होते. व्यावसायिकाने याकुब अलीला वेळोवेळी एक कोटी ३४ लाख ५४ हजार रुपये दिले. पैसे दिल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.